आदर्श शिक्षक
- श्री.पी.आर.आहिरेसर यांनी मुख्याध्यापक म्हणून जनता विद्यालय मुखेड येथे १० वर्षे काम केले. त्यांच्या कर्तृत्वाने तेथे गेल्यावर त्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही.आज आणि तेंव्हा अशी न कळत तुलनाही होते. मनात विनम्र भाव निर्माण होतो.
आमच्या मुखेड गावी १९६७ला मविप्र समाज नासिक यांचे वतीने नवीन हायस्कूलचा ८वीचा वर्ग सुरू झाला होता. मे१९६८ मध्ये मी ७वीची परीक्षा लासलगाव केंद्रातून २नंबरने पास झालो.मला ८वीला प्रवेश मिळाला,तेव्हा कळाले की,नवीन हेडसर म्हणून श्री.पी.आर.आहिरेसर आलेले आहेत. करारी चेहरा,उंच,सावळ्या रंगाचे सर,पहाता क्षणीच आदरयुक्त भीति मनात निर्माण झाली आणि ती पुढे कायम टिकून राहिली.सरांनी ८वीला मराठी आणि इंग्लीश विषय शिकविले. दर शनिवारी इंग्लीशच्या तासाला नवीन शब्द पाठ करून घेणे, इंग्लीश शब्दांच्या भेंड्या खेळणे, यामुळे इंग्लीश पक्के झाले आणि A,E,I,O,U,X and Y या अक्षरांनी सुरूवात होणारे शब्द आजही पाठ आहेत.
मी वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून मला सरांचे अधिक प्रेम आणि सहवास लाभला. मी सरांचे घरी रोज संध्याकाळी ६ नंतर पेपर वाचण्यासाठी आणि रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी जात असे.त्यामुळे सरांच्या स्वभावाचे अनेक पैलू कळाले. आमची घरची परिस्थिती यथातथाच होती.सरांनी मला शालेय लायब्ररीतून क्रमिक पुस्तके दिली.शाळेचे बांधकामाला नदीवरून पाणी आणून मारण्यासाठी दर रविवारी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सरांनी मला कामावर बोलावल्यामुळे मला आर्थिक मदत होई.सरांच्या प्रोत्साहनामुळे देवगावला संभाषण स्पर्धेत भाग घेतल्यावर मला क्रमांक दोनचे बक्षीस मिळाले. अकरावीला विद्यार्थ्याना सरांनी अभ्यासासाठी रात्री शाळेत झोपायला बोलाविले. सर स्वतः रात्री येऊन मार्गदर्शन करीत. त्यामुळे ११वीचा निकाल ६५ टक्के लागला.तेंव्हा ग्रामीण भागातील शाळेच्या या निकालामुळे संस्थेत शाळेचे आणि सरांचे नांव उज्वल झाले.
हायस्कूल नवीन असल्याने निवडक ग्रामस्थांच्या मिटींग घेऊन हायस्कूलच्या अडचणी सोडवित.देणग्या गोळा करीत. दरवर्षी नवीन वर्ग सुरू करण्यासाठी रूम बांधण्याची पराकाष्टा करीत. देशभक्ताचें फोटो, पाण्याचे पिंप, बाके,फलक इत्यादी बाबीसाठी सरांच्या विंनतीवरून गावकरी आर्थिक सहकार्य करीत.त्यांच्या प्रयत्नाने ४वर्षात महादेव मंदिर परिसरात ७ वर्गरूम तयार झाल्या.जवळच्या गावातील विद्यार्थ्याच्या पालकांच्या भेटी घेऊन शाळेसाठी देणग्या मिळवित होते.१५ ऑगस्टआणि २६ जानेवारीला शाळेत मोठा कार्यक्रम होऊन गावकरी मंडळींना शाळेची प्रगती निदर्शनास आणून देत.
११वीला मला७४.५टक्के मार्क मिळवून माझा लासलगाव केंन्द्रात आणि मविप्र समाज संस्थेत दुसर क्रमांक आला आणि शाळेत पहिला क्रमांक आला.त्यामुळे सरांनी ग्रामस्थाचे सहकार्य घेऊन माझा सत्कार केला आणि मला रू३५१ भेट दिले.मी कॉलेजला गेल्यावरही सर मार्गदर्शन करीत.. मी त्यांना अभिवादन करतो आणि सदैव त्यांचे ऋणात राहाणे पसंत करतो.
Comments
Post a Comment