मनाची मशागत ।। आम्ही हाकतो नांगरवखर अन काढतो वसण। जमिनीची करतो मशागत अन काढतो तण।। ढवळया पवळया नंदी साथीला दोघेजण। पाटपाण्यानं शेतातलं पीक होई आबादान।। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। म्हणे सावता माळी त्याला आम्ही राजी।। कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर। चंद्र शोधतो पांडूरंगा करावया मन थोर ।।रजतम सत्व गुणांचे आम्ही पुतळे। कामक्रोध मदमोह असूनि आम्ही सोवळे।। माझं माझं कबाडओझं कळेना आज। झाला उशीर परमार्थाला राखा आता लाज।। आपलाच म्हणोनी परदु:खाला द्यावी साद। शेजारी नाही परका त्याला करा आबाद।। भूकेल्यासाठी करावा आता कोडंयाचा मांडा । करा मनाची मशागत सोडा मोहाचा तांडा ।। आहेर वाळू रघुनाथ नासिक
Posts
Showing posts from May, 2022
- Get link
- X
- Other Apps
हुंकार घाम गाळत करतो मेहनत रात्रंदिन । त्याचे पायी चावतयं फाटकं पायतान ।। त्याला नाही रजा होईल त्याचा खाडा। त्याला झाली इजा तर लावतो रगतरोडा ।। शेकरतो पाचट जरी फाटलं छप्पर । चंद्रमौळी महालाचे दार वाजे करकर ।। मिणमिणत्या चीमणीला म्हणतो एलईडी। त्याच्या दावणीला दोन तीन शेरडी ।। मिळेना कण , उंदीर घालती धुमाकूळ। उद्याच्या चिंतेने होई जीव व्याकूळ।। सगळीकडे झाली त्याची उधारी। कामा येईना कोणी त्याचा शेजारी।। घरामधी खेळती चार कच्ची बच्ची। लागली तलप पण रिकामी हाय चंची ।। जीवाचा जिव्हाळा, घरधनी मोकळा। बाईल करि काम, तरीही अर्धा थाळा।। गरीबा घरी मिळते मीठभाकर। सपनातही नाही येत तूपसाखर।। तरीही घेई नाम त्या राजा विठोबाचे । अन भरतो हुंकार, येई बळ जगण्याचे।। --आहेर वाळू रघुनाथ.नासिक --