मी मॅट्रीक पास झालो.

तो जानेवारी महिन्याचा पहिला शनिवार होता. नाताळची सुट्टी संपून शाळा नुकतीच सुरु झाली होती. शनिवारी सकाळची शाळा असायची .आज जरा लवकरच मी सकाळी शाळेसाठी निघालो. मी अकरावीच्या वर्गात होतो.आज शाळेत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, म्हणून मनाला हूर हूर लागली होती. प्रार्थना होऊन वर्ग सुरू झाले. वर्गशिक्षक श्री. शिंदेसरांनी हजेरीपट घेतला. नंतर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला. सरांनी माझे खूप खूप अभिनंदन केले, कारण माझा वर्गात पहिला नंबर आला होता. सर्व मुलांमध्ये एकमेकांना शुभेच्छा देत मार्कांची विचारपूस सुरू झाली. 

इतक्यात शाळेचा खूळे शिपाई वर्गात नोटीस घेऊन आला. सरांनी नोटीस वाचून झाल्यावर सोमवारीच बोर्ड परिक्षेचा फाॅर्म भरावयाचा आहे, तरी सर्वांनी फाॅर्म फी तेवीस रूपये घेऊन येण्याची सूचनाकेली. नंतर दोन तीन तास झाले आणि शाळा सुटली. सर्व मुले लगबगीने घरी निघाले पण मी मात्र रेंगाळत रूपये तेवीस आणायचे कसे याचा विचार करत चालु लागलो.

कारण घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. 

वडीलांना दारू पिण्याचे व्यसन होते आई दररोज शेतमजुरी करून माझ्यासह सहा भावंडांचा उदरनिर्वाह करत होती.शाळा सुटल्यावर आम्ही सर्व भावंडें रोज गावगूरांचे शेण गोळा करण्याचे काम करून आईला मदत करायचो. 

आमच्या गल्लीत संपतरावच्या माडीखालून मी घराकडे येताना मला रस्त्यात वडील भेटले. मी वडीलांना म्हणालो, "आप्पा सरांनी सोमवारी फाॅर्म फी तेवीस रूपये घेऊन यायला सांगितले आहे . " आप्पा रागाने म्हणाले,"पैसे पैसे काही मिळणार नाही .जेवण करून शेण गोळा करायला पाटावर जा." मी रडत रडत घरी आलो. आईला सर्व वृतांत सांगितले. तिने माझे डोळे पुसत सांगितले, "काही तरी करू. "

मला आईने जेवण वाढले . जेवण करून नंतर पाटावर शेण गोळा करायला निघून गेलो.फीचे पैशाचा विचार मनात सारखा येत होता. 

संध्याकाळी परत आल्यावर जेवण झाल्यावर रात्री झोपतांना पडल्यापडल्या आईला विचारले ,पण तिने काही उत्तर दिले नाही .

सकाळ झाली, रविवार असल्याने आज शाळेसाठी सुट्टी होती. पणआम्ही नेहमी प्रमाणे दुपारी शेण गोळा करायला पाटावर निघून गेलो.संध्याकाळी घरी लवकर परतलो. 

तोंड हातपाय धुऊन आल्यावर आईनं मला चहा दिला. 

तेवढ्यात आमच्याकडे शेजारच्या संपतरावच्या वाड्यातील गडी शकंरमामा आला आणि म्हणाला, "वाळूभाऊ, तुला भाभीनीं वाड्यात बोलावलं आहे. लवकर ये ."असे म्हणून निघून गेला. मी चहा पिऊन झाल्यावर आईला सांगून वाड्याकडे निघालो.मनात विचार आला की कदाचित माझा मित्र धनंजय, भाभीचां मोठा मुलगा नासिकहून आला असेल, म्हणून बोलावलं असेल. धनंजय आल्यावर त्या नेहमीच मला बोलावून 

त्याचे जूने कपडे, वह्या पुस्तकं देवून मदत करायच्या.

 विचार करत वाड्यात गेलो.समोर लाकडी पलंगावर संपतराव बसलेले होते. भाभी खाली फरशीवर बसून त्यांच्याशी बोलत होत्या. मी दोघांना नमस्कार केला आणि धनंजयची खुशाली विचारली.शाळेतील परिक्षेत पहिला नंबर आला अशी माहिती दिली. घरची बोलणी झाल्यावर भाभी एकदम म्हणाल्या, "वाळू पाटील, उद्या शाळेत फाॅर्म भरणार का?"मी गप्प बसलो आणि नंतर रडत रडत म्हणालो,"आप्पा पैसे देत नाहीत. "

भाभी ऊठून माझ्याकडे आल्या आणि मला शांत करत म्हणाल्या, "वाळू पाटील, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला आता तेवीस रूपये देते.उद्या फाॅर्म भरावयाचा आहे. "त्याक्षणी मला त्यांच्या पायावर डोके ठेवले. 

लगेच कमरेच्या पिशवीतून मला तेवीस रूपये दिले आणि म्हंटले," यशस्वी व्हा."

मग न राहवून मी विचारलं की तुम्हाला कसं माहिती झाले. 

नंतर संपतराव म्हणतात, काल तूम्ही बाप लेकय आमच्या माडीखालून बोलत घराकडे गेले.तेव्हा माडीवरुन तुमचे बोलणं ऐकले.

तेव्हा पासून भाभींना मनाला चुट्पुट लागली.

वाळू पाटलानां बोलावून मदत करायची असा विचार झाला." पुन्हा एकदा दोघांना 

नमस्कार करून घरी आलो आणि आईवडिलांना भाभीनीं मदत केली आहे असे सांगितले. 

सोमवारी शाळेत जाऊन रीतसर मॅट्रीकचा परीक्षा फाॅर्म भरला. यथावकाश परीक्षा मार्चमध्ये आहे असे कळले. दोन महिने रात्रंदिवस अभ्यास केला. इतरही अडचणी आल्या.पण मुख्याध्यापक श्री. आहिरेसरांच्या 

मदतीने मार्चमध्ये मॅट्रीकची परीक्षा दिली. 

उन्हाळ्यात मजूरीची कामं करून थोडी रक्कम जमा केली. 

10जूनला मॅट्रीकचा निकाल गावकरीत छापून आला. मला 74.5%मार्क मिळाले. मला शाळेत प्रथम क्रमांक मिळाला. लासलगाव केंद्रातून आणि मराठा विद्या प्रसारक समाज नासिक या संस्थेतून द्वितीय 

क्रमांक मिळाला. गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गावकरी मंडळीनीं माझा सत्कार केला. मला बक्षीस म्हणून 350/-रूपये मिळाले. शनिवारी पेढे घेऊन देवाला ठेवले आणि नंतर वाड्यात भाभी आणि संपतरावाना पेढे घेऊन गेलो.उभयतांना नमस्कार करून पेढे दिले. मी दोघांना म्हटले की केवळ तुम्ही मदत केली म्हणून मी मॅट्रीक पास झालो.माझा शाळेत पहिला नंबर आला. ही सर्व तुमचीच कृपा झाली म्हणून शक्य झाले. 

भाभी म्हणाल्या, "तुम्ही मला माझ्या धनंजय सारखेच आहात. आता एवढ्यावर थांबायचे नाही. काॅलेजात जायचं. डॉक्टर /इंजिनिअर व्हायचं ".काही कॉलेजमध्ये शिकत असताना कमी पडले तर त्याचाही विचार करू."

माऊलीने तोंडभरून आशिर्वाद दिले. पुढे भविष्यात त्यांनी खूप मदत केली. अगदी पुण्यात भेटायला येऊन मदत केली.त्यामुळे पुढे भविष्यात इंजिनिअर झालो.त्या दोघांच्या सदैव ॠणात राहिल.

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS